उपोषण मागे घेतलं, पण राजीनाम्याचं काय? सोनम वांगचुक यांनी सांगितलं नेमकं कारण
मुंबई (प्रतिनिधी) : २८ जूनपासून सुरू असलेलं २६ दिवसांचं उपोषण अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मागे घेतलं आहे. मध्यरात्री उपोषण सोडताना त्यांनी आंदोलनाबाबत झालेल्या चर्चेची आणि सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांची सविस्तर माहिती दिली.

वांगचुक यांनी सांगितलं की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी भेट घेऊन सरकारच्या वतीने काही महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. जंतर-मंतरवरील आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, २० जुलैच्या मोर्चातील सहभागींच्याही विरोधात कारवाई होणार नाही आणि संसदेत 'नीट' पेपर फुटी तसेच परीक्षा व्यवस्थेवर चर्चा केली जाईल, असं सरकारने लेखी स्वरूपात मान्य केलं आहे.
याशिवाय, 'नीट' पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नसल्याचं वांगचुक यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, "तुम्ही नक्की विचाराल की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं? सध्या तरी सरकारने याबाबत कोणताही शब्द दिलेला नाही. मात्र, या मुद्द्यावर संसदेत चर्चा होईल."
राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, "जर राजीनामा झाला नाही, तर त्याचं नुकसान मुलांचं नाही, तर सरकारचंच होईल. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं की आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतेही खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत, आणि ते आम्ही साध्य केलं."शेवटी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानत त्यांनी लोकशाहीच्या माध्यमातून हा लढा पुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.




