डॉ. डी. वाय. दादांच्या जाण्याने वैयक्तिक अन् महाराष्ट्राची मोठी हानी ; मंत्री उदय सामंत भावुक
कोल्हापूर: ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकुल वातावरण आहे. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत भावुक शब्दांत डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. "आजचा दिवस अत्यंत दुःखद असून डी. वाय. दादांच्या जाण्याने पाटील कुटुंबासोबतच आमची वैयक्तिक आणि संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे," अशा भावना उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.

"राजकारणाच्या पलीकडचे कौटुंबिक नाते"
माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले,पद्मश्री डी. वाय. दादांसोबत माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे आणि अतिशय कौटुंबिक होते. ज्या पद्धतीने विजय दादा, अजिंक्य दादा, संजय दादा आणि बंटी साहेब (सतेज पाटील) आहेत, त्याच पद्धतीने त्यांनी मलाही नेहमी मार्गदर्शन केले, सहकार्य केले आणि माझ्यावर प्रेम केले."
"२०-२५ दिवसांपूर्वीच झाली होती भेट"
आपल्या आठवणींना उजाळा देताना सामंत म्हणाले की, "त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी माझ्या स्मरणात आहेत. अवघ्या २० ते २५ दिवसांपूर्वीच मी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दादांना भेटलो होतो, त्यांच्याशी सविस्तर बोललो होतो. आज ते आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही."
शिक्षण अन् समाजकारणातील मोठे व्यक्तिमत्त्व हरपले
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या योगदानाचा उल्लेख करत उदय सामंत म्हणाले की, ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षण क्षेत्रात आणि समाजकारणात अतुलनीय काम केले, त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणातून, समाजकारणातून आणि शिक्षण क्षेत्रातून एक खूप मोठे आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व निघून गेले आहे. याचे आपल्या सर्वांनाच प्रचंड मोठे दुःख आहे.




