टीईटी पेपरफुटीनंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. 28 जून 2026 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने रविवारी होणारी परीक्षा तातडीने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.या संपूर्ण प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, *"नीट पेपरफुटीचं उदाहरण ताजं असतानाही टीईटी परीक्षा सुरक्षित पार पडावी यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार? टीईटीचा पेपर फुटणं म्हणजे केवळ एका परीक्षेचा घोटाळा नसून लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. प्रत्येक वेळी पेपरफुटी होते, चौकशी जाहीर होते, काही जणांना अटक होते आणि काही दिवसांनी सर्व काही शांत होतं. मात्र विद्यार्थ्यांचं गेलेलं वर्ष, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार?"* असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जून रोजी राज्यातील 1028 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा होणार होती. नीट परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था असल्याचा दावा परीक्षा परिषदेने केला होता. मात्र, 27 जूनच्या पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी पोलिसांनी संशयित ठिकाणांवर छापे टाकले.
या कारवाईदरम्यान काही संशयितांकडून टीईटी प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती आणि प्रश्न जप्त करण्यात आले. परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोचिंग क्लास चालकांसह शिक्षण विभागातील काही संशयितांची चौकशी सुरू आहे.
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परीक्षा पूर्ण पारदर्शक वातावरणात व्हावी, या उद्देशाने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणा लवकरच परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.मात्र, ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशी झालेल्या या पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




