राज्यभरात विनापरवाने पुतळे कोण बसवतंय? अंजनगाव खेलोबातील मास्टरमाईंड सापडला

राज्यभरात विनापरवाने पुतळे कोण बसवतंय? अंजनगाव खेलोबातील मास्टरमाईंड सापडला

सोलापूर (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीतून महापुरुषांचे पुतळे बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. सोलापूर जिल्ह्यातही अशाच प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे रात्रीतून पुतळा बसवण्यात आल्यानंतर दोन समाजांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील शेकडो लोकांवर तब्बल आठ विविध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये जीवघेणा हल्ला, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दंगल भडकवणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.

प्राथमिक तपासात जालना जिल्ह्यातील बाळराजे आवारे याचा या प्रकरणात सहभाग समोर आला असून, त्याच्याविरोधात विना परवाना पुतळा बसवणे, जातीय तेढ निर्माण करणे, पोलीस वाहनांचे नुकसान, जीवघेणा हल्ला आणि भडकाऊ भाषण करणे अशा तीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, करमाळा तालुक्यातील पुनावर येथे बसवण्यात आलेल्या पुतळा प्रकरणातही त्याचाच सहभाग असल्याचे समोर आले असून त्या प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ही  बाळराजे आवारे विरोधात विविध प्रकारणात  जवळपास अकरा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान, अंजनगाव येथे जमिनीच्या मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याविरोधातही शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सोलापुरात सुरु असलेल्या पुतळा प्रकारावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. कोणी पुतळा दिला आणि कोण बसवला याचा तपास सुरू आहे. सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम किंवा महाराजांचा अवमान करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. सोलापुरात ही नववी घटना असून अशा प्रकारे पुतळा बसवल्यावर त्यांना परवानगी दिली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे.