पंढरपुरात VIP दर्शनावर कडक निर्बंध! आमदार-खासदारांनाही प्रोटोकॉलचेच पालन; नियम मोडल्यास थेट गुन्हा

पंढरपुरात VIP दर्शनावर कडक निर्बंध! आमदार-खासदारांनाही प्रोटोकॉलचेच पालन; नियम मोडल्यास थेट गुन्हा

पंढरपूर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठी 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेएन यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न करणाऱ्यांवर आपत्कालीन कायद्याअंतर्गत थेट गुन्हा दाखल केला जाईल.

प्रोटोकॉलनुसार मंत्री, आमदार आणि खासदार यांना दर्शनाची परवानगी असेल. मात्र, त्यांच्या सोबत केवळ दोन ते तीन व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून मोठा लवाजमा मंदिरात येऊ दिला जाणार नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर हा निर्णय लागू करण्यात आला. पहिल्या दिवशी काही प्रमाणात गोंधळ झाल्याची कबुली प्रशासनाने दिली असली, तरी यापुढे नियमांची अत्यंत कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वाखरी येथील नव्या पुलाच्या बाजूचा भराव पहिल्याच पावसात खचल्याची घटना घडली होती. मात्र, मुख्य पुलाला कोणताही धोका नसून भरावाची दुरुस्ती पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच पालखीतळ परिसरात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.आषाढी यात्रेपूर्वी सुरू झालेला पाऊस वारकऱ्यांसाठी आणि जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरणार असल्याचा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.