मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाआधी मुंबईत कठोर नियम लागू; आझाद मैदान वगळता इतरत्र धरणे-सभांवर बंदी
मुंबई/प्रतिनिधी : मुंबईत होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या गृह विभागाने अत्यंत कठोर नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमांमुळे आगामी काळात मुंबईत आंदोलनाचे हत्यार उपसणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह विविध आंदोलक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईत आता आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी निदर्शने, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

गृह विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिली जाणार असली, तरी ती केवळ एका दिवसासाठी आणि सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच मर्यादित असेल. सायंकाळी ६ वाजल्यानंतर मैदानात थांबल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईसह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी यांसारखी वाहने किंवा प्राण्यांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही बेमुदत ठिय्या आंदोलनाला किंवा मोर्चांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
नेत्यांच्या भूमिकेवर परिणाम?
मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांचेही नियोजित लढे सुरू आहेत. अशा Rकठीण आणि निर्बंधात्मक नियमांमुळे आंदोलकांची मोठी सोयिस्कर कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले, तरी या नियमांमुळे आगामी राजकीय व सामाजिक आंदोलनांवर मोठा परिणाम होणार हे निश्चित मानले जात आहे.




