आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियन प्रकरणी हायकोर्टातील सुनावणी पूर्ण, आता निर्णयाकडे लक्ष
मुंबई (प्रतिनिधी) : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तिचे वडील सतीश सालियन यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू असून, यापूर्वी हायकोर्टाने मुंबई पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, या संवेदनशील दृष्टीने आम्ही या प्रकरणाकडे पाहत असल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं.

त्यानंतर आज सरकारी वकील आणि आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर याप्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आता हायकोर्ट या प्रकरणात नेमका काय निर्णय देतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
आजही सरकारी वकील शिशिर हिरे यांचा युक्तिवाद पाहायला मिळाला. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने आतापर्यंत झालेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच, अजूनही एफआयआर दाखल करून तपास करता येऊ शकतो, असं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं होतं.
राजकारण्यांविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीत आम्हाला रस नसून, एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, याच दृष्टीने आम्ही या प्रकरणाकडे पाहत आहोत, असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष लागलं होतं.
दरम्यान, दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात राणेंच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला. माझ्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी ही याचिका दाखल करण्याचं प्रकरण घडवून आणलं आहे. त्यात राणे, त्यांची मुलं आणि राष्ट्रीय मीडियामधील एक व्यक्ती म्हणजेच अर्णब गोस्वामी यांचा समावेश आहे, असा युक्तिवाद आदित्य ठाकरेंचे वकील सीनियर काउन्सिल सुदीप पासबोला यांनी केला.ही याचिका टिकण्यायोग्य नसल्याचंही ठाकरेंच्या वकिलांनी म्हटलं. दिशाच्या वडिलांबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे आणि त्यांना क्लोजर मिळायला पाहिजे, या मताचे आम्हीही आहोत. मात्र, याचिकेत करण्यात आलेल्या काही मागण्या टिकण्यायोग्य नाहीत, असा युक्तिवाद करण्यात आला.
माझ्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची ही खेळी असून, याचिका तथ्यांवर आधारित नाही. वाट्टेल ते आरोप करून राजकीय वैर साध्य करण्यासाठी ही याचिका करण्यात आल्याचा दावा आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी केला.दिशाच्या वडिलांबाबत माझी पूर्ण संवेदना आहे. मात्र, त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून जे राजकारण सुरू आहे, ते थांबायला हवं, अशी भूमिकाही वकिलांनी न्यायालयात मांडली.
दरम्यान, दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात कोणताही गुन्हा घडलेला नसल्याचं सांगत सरकारी वकिलांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली. मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलेलं नाही. डॉक्टरांच्या तपासणीतही तसं काही आढळलं नाही, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.
खूप आरोप-प्रत्यारोप होत असल्याने इतका काळ तपास सुरू राहिला. दिशा रोहित रॉयसोबत राहत होती आणि त्यामुळे त्याचा जबाब महत्त्वाचा आहे. रोहितनेही दिशाचं म्हणणं होतं की ती खूप नैराश्यात होती आणि त्यातून तिने आत्महत्या केली, असा जबाब दिल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं.
याप्रकरणी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी समोर यावं, असं आवाहनही करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर कोणीही समोर आलं नाही, असं सरकारी वकिलांनी म्हटलं.
दरम्यान, तुम्ही म्हणता की ती तोंडावर पडली, मग एवढ्या उंचीवरून पडून कोणतंही महत्त्वाचं हाड फ्रॅक्चर कसं झालं नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना केली.त्यावर दिशाच्या दातांना फ्रॅक्चर झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. प्रत्येक व्यक्ती खाली पडल्यानंतर होणाऱ्या दुखापती वेगवेगळ्या असतात, असंही सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं.
यावेळी १५ जानेवारी २०२४ रोजी दिशाच्या वडिलांनी दिलेला जबाब न्यायालयात वाचण्यात आला. माझ्या मुलीची डील कॅन्सल झाली आणि त्यातून झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे तिने आत्महत्या केली असावी, असं मला वाटतं, असं त्यांनी जबाबात म्हटलं होतं.आत्तापर्यंत पाच वेळा त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त मला काही सांगायचं नाही, असंही दिशाच्या वडिलांनी सांगितलं होतं, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
तसंच, दुसऱ्या एका गुन्ह्यात सतीश सालियन यांचा सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आला होता. त्यामध्येही त्यांनी कोणताही संशय व्यक्त केला नव्हता, असं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं.आता दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले असून मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे दिशा सालियन प्रकरणात न्यायालय नेमका काय निर्णय देतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




