ट्रोलर्सना माफ करणार, पण NEETमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची माफी कोण मागणार? राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल

ट्रोलर्सना माफ करणार, पण NEETमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची माफी कोण मागणार? राज ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांनी मला ट्रोल केलं, त्यांना मी माफ करतो, असे वक्तव्य केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले. NEET पेपरफुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार? आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची डोकी फोडली, त्याचं उत्तर कोण देणार? असा थेट सवाल त्यांनी केला.

राज ठाकरे म्हणाले, २३ लाख JEE परीक्षार्थ्यांसाठी अवघ्या १ लाख जागा उपलब्ध आहेत. २०१४ मध्ये सुमारे ३ लाख विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात गेले होते. २०२६ मध्ये ही संख्या ९ लाख १० हजारांवर पोहोचली आहे. एवढी मुलं परदेशात का जात आहेत? नोकऱ्या इथेही मिळू शकतात, पण सभोवतालचं वातावरण त्यांना परदेशाकडे ढकलत आहे. ग्रामीण भागात अनेक गुणी चित्रकार, खेळाडू आणि तरुण आहेत, पण त्यांना संधी नाही, दिशा नाही आणि कुणाकडे जावं हेही कळत नाही. त्यामुळे तरुणांमध्ये साचलेला असंतोष आता बाहेर पडत आहे.

ते पुढे म्हणाले, NEET पेपरफुटीचा राग तर आहेच, पण वर्षानुवर्षे साचलेल्या अनेक प्रश्नांचं काय करणार? हजारो उद्योगपती देश सोडून परदेशात गेले. एवढंच नाही, नरेंद्र मोदींवरील चित्रपटात त्यांची भूमिका करणारे विवेक ओबेरॉयही दुबईत स्थायिक झाले, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी पुढे सांगितले, देशातील विद्यार्थ्यांचं, तरुणांचं म्हणणं समजून घेण्याची गरज आहे. विद्यार्थी हतबल झाला की तो देवाकडे धाव घेतो. नोकरी मिळावी, आयुष्य घडावं अशी प्रार्थना करतो. पण त्याच वेळी देवळांमध्येही चोरीच्या घटना घडतात. राम मंदिरासारख्या भावनिक विषयाशी संबंधित ठिकाणी १४०० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराची चर्चा होते आणि त्यावर सरकारमधील कोणीही बोलत नाही. राम मंदिरावर मतं मागताना जे पुढे होते, त्यांनी आता या विषयावरही बोलायला नको का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, आजचा हताश तरुण मंदिरांचा रस्ता पकडतो आहे. त्याला धर्मांध बनवू नका, शिक्षण आणि रोजगाराच्या वाटेवर आणा. फक्त 'जय श्रीराम'च्या घोषणा देऊन प्रश्न सुटणार नाहीत. एकीकडे गोरक्षक गाई पकडत आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान ऑस्ट्रेलियात जाऊन भारत बीफ निर्यातीत अव्वल असल्याचं सांगतात. मग या विरोधाभासाचं उत्तर कोण देणार? देश नेमका कोणत्या दिशेने चाललाय? असा सवालही त्यांनी केला.

शेवटी सरकारवर टीका करत राज ठाकरे म्हणाले, दिसली जमीन की द्या अदानींना, दिसलं जंगल की द्या अदानींना, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.