घर सुटलं, पण कर्तव्य नाही! वारीतील माऊलींची अनोखी गोष्ट
विशेष प्रतिनिधी (विश्वनाथ मोरे) : विठुरायाच्या भेटीची आस लावून बसलेले लाखो वारकरी सध्या पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत आहेत. भक्तीच्या या महासागरात दरवर्षी एक विशेष चित्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते, आणि ते म्हणजे वारीत सहभागी झालेल्या महिला वारकरी !

या महिलांचे वारीतील महत्त्व खरोखरच विशेष आहे. त्याचं कारणही तसंच आहे. दिवसभर मुखी विठ्ठलाचे नाव घेत, कडक उन्हा-पावसाची परवा न करता मैलोन्मैल पायी प्रवास करायचा. आणि रात्र होताच, दमून-भागून आलेल्या हजारो वारकऱ्यांसाठी प्रेमाने भोजनाची व्यवस्था करायची.
स्वतःचे घरदार सोडून या माऊली विठ्ठल दर्शनासाठी निघाल्या आहेत. पण वारीत आल्यावरही त्या आपले कर्तव्य विसरत नाहीत. लहान मुले असोत की वयस्कर वारकरी, प्रत्येकाची काळजी घेत, स्वतःला सांभाळत या महिला वारीमध्ये नेहमीच अग्रेसर राहतात.

वारी ही फक्त वयस्कर लोकांची राहिलेली नाही. यात अबालवृद्धांसह खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील सर्वच घटकांचे योगदान लाखमोलाचे आहे. पण, भक्ती आणि कर्तव्याचा हा अनोखा मेळ घालणाऱ्या या महिला वारकऱ्यांना आमचा मानाचा मुजरा!




