नाशिक TCS प्रकरणात नवीन वळण; मालेगावच्या इस्लाम पार्टीकडून आरोपींना कायदेशीर मदत
मुंबई (प्रतिनिधी) : येथील बहुचर्चित टीसीएस कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. यापूर्वी या प्रकरणातील आरोपींना आश्रय दिल्याचा आरोप 'एमआयएम'चे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर झाला होता. त्यानंतर आता मालेगावस्थित 'इस्लाम पार्टी'नेही या प्रकरणात उडी घेत संशयित आरोपींना कायदेशीर मदत देण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, आज नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख स्वतः उपस्थित होते.

या खटल्यासाठी इस्लाम पार्टीने स्वतंत्र वकिलाची नियुक्ती केली असून, त्यांच्या वतीने आरोपी दानिश शेख याची बाजू न्यायालयात मांडण्यात आली. "हे प्रकरण भविष्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले तरी इस्लाम पार्टी ही कायदेशीर लढाई लढत राहील," अशी भूमिका माजी आमदार आसिफ शेख यांनी स्पष्ट केली.
आरोपी दानिश शेखचे वकील फैज वसीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "निदा खान प्रकरणात आम्ही दानिश शेखच्या वतीने न्यायालयात हजर होतो. सरकारी पक्ष, फिर्यादी पक्ष आणि आमच्या बाजूने सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. अटकेनंतर दानिशला प्रथम पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. जामिनासाठी दाखल केलेला त्याचा पहिला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे."
दरम्यान, इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात असल्याचा आरोप केला. "टीसीएस प्रकरण नाशिकमध्ये घडले असले तरी त्याला जाणीवपूर्वक धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित सर्वजण एकत्र काम करणारे आणि परस्पर परिचित होते. मात्र काही जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले. दानिश शेखच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती. त्यानंतर आम्ही त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली. पुढेही अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आम्ही उभे राहू. ही लढाई नाशिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली तरी इस्लाम पार्टी त्यात सहभागी राहील," असे त्यांनी सांगितले.




