भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोरांची मुसंडी! विजय मिळताच दिली पहिली प्रतिक्रिया

भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोरांची मुसंडी! विजय मिळताच दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई (प्रतिनिधी) : बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी ऐतिहासिक विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या प्रभावाच्या मतदारसंघात जन सुराज पक्षाने जोरदार लढत देत विजय मिळवला. गेल्या विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडू शकलेल्या जन सुराज पक्षासाठी हा विजय मोठा राजकीय टप्पा मानला जात आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत किशोर म्हणाले, हा विजय माझा नाही, तर बदलाची अपेक्षा असलेल्या बिहारच्या जनतेचा आहे. पुढील तीन महिन्यांत बांकीपूरमध्ये विकासाची नवी दिशा दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी बिहारच्या नेतृत्वावरही भाष्य केले. जनतेने मोठा कौल दिला आहे. आता बिहारला प्रामाणिक आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे. शिक्षण, रोजगार आणि सुशासनाला प्राधान्य देणारा मुख्यमंत्री राज्याला मिळायला हवा, असे ते म्हणाले.

प्रशांत किशोर हे देशातील आघाडीचे निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. विविध पक्षांसाठी निवडणूक नियोजन केल्यानंतर त्यांनी जन सुराज पक्षाची स्थापना करत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.विकास, शिक्षण, रोजगार आणि सुशासन या मुद्द्यांवर राजकारण करण्याचा दावा करणाऱ्या जन सुराज पक्षाचा हा पहिला विधानसभा विजय असून, बिहारच्या राजकीय समीकरणात त्याला महत्त्वाचे स्थान मिळाल्याची चर्चा आहे.