माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, दोन तासांत परत करेन’; काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक, नेमकं काय घडलं?

माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, दोन तासांत परत करेन’; काँग्रेस खासदाराचा मोबाईल हॅक, नेमकं काय घडलं?

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल हॅक झाल्यानंतर खासदारांच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक व्यक्तींना व्हॉट्सॲपवरून पैसे पाठवण्याची मागणी करणारे मेसेज करण्यात आले. काही व्यक्तींना ‘माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन’, असा मेसेज पाठवण्यात आला. तर काहींना ‘Help Me’ असे संदेश आल्याने संबंधित व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल त्यांच्याकडे नसून त्यांच्या पीएकडे होता. त्याचवेळी एका व्यक्तीचा फोन आला. ‘तुमचं कुरिअर आलं आहे, मात्र पत्ता सापडत नाही. तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, ती तपासा,’ असं फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याचं समोर आलं आहे. यानंतर संबंधित लिंक उघडल्यानंतर काही वेळातच खासदारांचा मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार समोर आला. मोबाईल हॅक केल्यानंतर सायबर फसवणूक करणाऱ्यांनी खासदारांच्या नावाने त्यांच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना मेसेज पाठवत पैशांची मागणी सुरू केली.

हॅक झालेल्या मोबाईलवरून काही व्यक्तींना 62 हजार रुपये पाठवण्याची मागणी करण्यात आली. ‘माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन,’ असा संदेश अनेकांना पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर डॉ. शोभा बच्छाव यांना आपला मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार लक्षात आला.

मोबाईल हॅक झाल्याचं समजताच खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तांत्रिक तपास सुरू केला.काही वेळाच्या प्रयत्नांनंतर डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल पुन्हा सुरक्षित करण्यात सायबर पोलिसांना यश आल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा धोका अधोरेखित झाला आहे. कुरिअर, बँक, सरकारी संस्था किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने येणारे संशयास्पद फोन, मेसेज किंवा लिंक याबाबत नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. खासदारांच्या मोबाईलमधूनच त्यांच्या परिचितांना पैसे मागणारे मेसेज गेल्याने अनेकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वेळीच काही व्यक्तींनी खासदारांशी संपर्क साधल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि सायबर पोलिसांनी हस्तक्षेप करत मोबाईल सुरक्षित केला.दरम्यान, मोबाईल हॅक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.