तुकाराम मुंढेंनी सगळी माहिती दिली, एकनाथ शिंदेंनी थेट आदेश दिले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

तुकाराम मुंढेंनी सगळी माहिती दिली, एकनाथ शिंदेंनी थेट आदेश दिले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबई (प्रतिनिधी) : ‘विकसित महाराष्ट्र 2047’ अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी विभागासाठी निश्चित करण्यात आलेले टप्पे आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीसंदर्भात काल सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.

भेसळीच्या प्रकरणांमधील कायदेशीर प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. ज्यांच्यावर कारवाई होते, त्यांच्या खटल्यांचे कामकाज न्यायालयात सुरू असताना कोणतीही कायदेशीर त्रुटी राहता कामा नये, यासाठी नामवंत आणि ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची मदत घेण्यात यावी, तसेच तातडीने विशेष लीगल टीम तयार करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची सूचना एकनाथ शिंदे यांनी केली.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात माहिती देण्यात आली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती बैठकीत दिली.

यानंतर राज्यातील दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

न्यायालयात या प्रकरणांची सुनावणी सुरू असताना कायदेशीर बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अनुभवी कायदेतज्ज्ञांची मदत घ्यावी आणि त्यासाठी तातडीने विशेष कायदेशीर पथकाची स्थापना करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.सह्याद्री अतिथीगृहात 2026-27 या वर्षासाठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सादरीकरण करण्यात आले.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणे हा केवळ सामान्य स्वरूपाचा गुन्हा नसून, नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले.लहान मुले मोठ्या प्रमाणात दूधाचे सेवन करतात. अशा परिस्थितीत दुधात भेसळ करणे, बनावट पनीर तयार करणे किंवा इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशा भेसळीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर आणि अजामीनपात्र कारवाई करण्यात यावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले.

सरकारकडून दूधातील भेसळ, बनावट पनीर, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात मकोका लावण्याची घोषणा यापूर्वीही अनेक वेळा करण्यात आली आहे.याशिवाय प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणारे, गोवंशाची बेकायदा वाहतूक करणारे आणि बेकायदा कत्तल करणारे यांच्याविरोधातही मकोका अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा यापूर्वी करण्यात आली आहे.

मात्र, या घोषणांनंतरही राज्यात बनावट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. दूधातील भेसळ, बनावट पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणारे आरोपी अनेकदा पकडले जातात. मात्र, यापैकी किती जणांवर प्रत्यक्षात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, याची अधिकृत आकडेवारी सरकारकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.