लाडक्या बहिणींना आता मोफत साडीही नाही? सरकारच्या निर्णयावर रोहिणी खडसेंचा संताप
मुंबई (प्रतिनिधी) : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेनंतर आता राज्य सरकारने गरीब महिलांसाठीची मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक तुटवड्याचे कारण देत वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय जाहीर केला असून, त्यावरून राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले,"2100-1500 रुपयांच्या घोषणा सोडा, आता लाडक्या बहिणींसाठी एक साडीही परवडत नाही का?" निवडणुकीपूर्वी महिलांना मोठमोठी आश्वासने देण्यात आली, मात्र आता आर्थिक अडचणींचे कारण पुढे करून एकामागून एक योजना बंद केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
खडसे यांनी सरकारवर महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच महिलांसाठीच्या योजनांबाबत सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, 2023 मध्ये सुरू झालेल्या 'कॅप्टिव्ह मार्केट योजने'अंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक गरीब महिलांना दरवर्षी मोफत साडी दिली जात होती. या योजनेमुळे राज्यातील यंत्रमाग उद्योगालाही चालना मिळत होती.
मात्र, वस्त्रोद्योग विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार आर्थिक भार आणि राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दरवर्षी लाभ घेणाऱ्या सुमारे 25 लाख गरीब महिलांना यंदाच्या दिवाळीत मोफत साडी मिळणार नाही.




