२०२९ पर्यंत रहिवाशांना सर्व घरांच्या चाव्या देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२०२९ पर्यंत रहिवाशांना सर्व घरांच्या चाव्या देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी): बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित होता, यामध्ये अडचणी होत्या. यामुळे खासगी विकासकावर अवलंबून न राहता हा प्रकल्प शासन करेल, असा निर्णय घेण्यात आला. आता हा प्रकल्प तयार झाला. मुंबईतील इतर पुनर्विकासाचे काम वेगाने झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू असून सर्व बीडीडी चाळीतील रहिवाशांना २०२९ पर्यंत घराच्या चाव्या रहिवाशांना देण्याचे उद्दिष्ट्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच बीडीडी चाळीतील रहिवाशांनी घरे विकू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ५ पुनर्वसन इमारतींतील ८६४ रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांचे वितरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान सभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर रितू तावडे, आ. चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर, मनीषा कायंदे, सिद्धिविनायक न्यायाचे अध्यक्ष सदा सरवणकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता उपस्थित होते.

     देवेंद्र फडणवीस म्हणाले, नायगाव येथील पार्किंगच्या समस्येबाबत मार्ग काढून या ठिकाणी असलेल्या भवानी माता मंदिराबाबतचा प्रश्न सोडवण्यासाठी ९०० चौरस फूट जागा दिली जाणार आहे. पोलिसांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या घराच्या किमतीच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून तो सोडवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.