जयंत पाटलांच्या सलग दोन गुप्त भेटी; फडणवीसांनंतर शिंदेंसोबतही बंद दाराआड चर्चा

जयंत पाटलांच्या सलग दोन गुप्त भेटी; फडणवीसांनंतर शिंदेंसोबतही बंद दाराआड चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

काल रात्री उशिरा मुंबईतील 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास तासभर ही बैठक चालली. यातील सुमारे अर्धा तास जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या भेटीमुळे शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार का, या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. काही माध्यमांतील सूत्रांच्या माहितीनुसार, अशा घडामोडी झाल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

याआधी मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन महायुतीसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना वेग आला.

यानंतर सुनील तटकरे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, जयंत पाटील यांच्या उपस्थितीबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितल्याची चर्चा आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार वर्षा बंगल्यावरील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या एनडीएतील संभाव्य सहभागावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच संसदेतील मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.