'विमल वेलची'ची जाहिरात भोवणार? शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला FDA कडून कारणे दाखवा नोटीस
मुंबई: प्रतिबंधित पान मसाल्याची अप्रत्यक्ष (सरोगेट) जाहिरात केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘विमल वेलची’च्या नावाने केली जाणारी ही जाहिरात प्रत्यक्षात महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी असलेल्या ‘विमल पान मसाला’चाच प्रचार करत असल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. एफडीएने अजय देवगण यांच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खान यांच्या ‘मन्नत’ बंगल्यावर आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पत्त्यावर या नोटिसा पाठवल्या आहेत.

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम २४ (दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी) आणि कलम ५३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, दोषी आढळल्यास १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अन्न सुरक्षा नियम २०१८ चा हवाला देत एफडीएने या तिन्ही कलाकारांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात १३ जुलै २०२६ पासून पुढील एका वर्षासाठी तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांवर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अन्न सुरक्षा आणि गुटखाविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. २५ मे ते ३१ जुलै दरम्यान एफडीएने ६५८ ठिकाणी छापे टाकून १५ कोटींहून अधिक किमतीचा बेकायदा माल जप्त केला असून ५१९ एफआयआर नोंदवून ७०१ जणांना अटक केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी बेकायदा गुटखा तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 'विमल' ब्रँडच्या सरोगेट जाहिराती यापूर्वीही कायदेशीर वादात सापडल्या होत्या; मात्र आता थेट अभिनेत्यांवरच एफडीएने कारवाईचा बडगा उगारल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.




