डीकेटीईत स्वातंत्र्यदिनी शहीद कुटुंबाचा सन्मान; वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण व कृतज्ञतानिधी सुपुर्द

डीकेटीईत स्वातंत्र्यदिनी शहीद कुटुंबाचा सन्मान; वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण व कृतज्ञतानिधी सुपुर्द

इचलकरंजी (प्रतिनिधी): स्थानिक डीकेटीई संस्थेत दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदाच्या ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील वीर शहीद जवान रोहित खन्नीकुडे यांच्या वीरपत्नी श्रीमती शशीकला खन्नीकुडे व त्यांच्या कुटुंबीयांच्या शुभहस्ते पार पडला.

कार्यक्रमप्रसंगी सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून शहीद जवान रोहित खन्नीकुडे यांच्या शौर्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर डीकेटीई परिवाराच्या वतीने 'हौताम्य वंदन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, संस्थेच्या सचिवा डॉ. सपना आवाडे यांच्या हस्ते वीरपत्नी शशीकला खन्नीकुडे व सैनिक कुटुंबास मदतीचा धनादेश (कृतज्ञतानिधी) सुपुर्द करण्यात आला.

यावेळी डॉ. सपना आवाडे म्हणाल्या, "सीमेवर जवान अहोरात्र खडा पहारा देऊन कर्तव्य बजावत असल्यामुळेच देशातील सर्व नागरिक सुरक्षित जीवन जगू शकत आहेत. देशसेवेसाठी आपल्या बलिदानाची आहुती देणाऱ्या वीरपुत्राच्या कुटुंबाच्या दुःखात डीकेटीई परिवार सदैव सहभागी असून, संस्था कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील."

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या सोहळ्यास संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, सोशल विभागाचे प्रमुख डॉ. ए. आर. बलवान यांच्यासह सर्व विभागांचे डीन, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी आणि हुतात्मा खन्नीकुडे कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.