कोल्हापुरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना
कोल्हापूर/ प्रतिनिधी : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे शासकीय मुख्य ध्वजारोहण सोहळा थाटात पार पडला.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि पोलीस दलाकडून मानवंदना स्वीकारली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेत आरोग्य सुविधा बळकट करण्यासह सर्वसमावेशक विकासाचा संकल्प व्यक्त केला.
या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, खासदार धनंजय महाडिक, ललित गांधी यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




