एका षटकात दोन शतकांचा इतिहास! लखनऊमध्ये शुभमन-ईशानची धावांची आतषबाजी

एका षटकात दोन शतकांचा इतिहास! लखनऊमध्ये शुभमन-ईशानची धावांची आतषबाजी

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला.कर्णधार शुभमन गिल आणि यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन यांनी अवघ्या एका ओव्हरमध्ये शतके झळकावत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने दमदार सुरुवात केली.कर्णधार शुभमन गिलने अफलातून खेळी साकारत केवळ 77 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.वनडे कारकिर्दीतील त्याचे हे नववे शतक ठरले, तर कर्णधार म्हणून वनडेमधील पहिले शतक नोंदवण्याचा मानही त्याने मिळवला.

विशेष म्हणजे, गिलने 33व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत ईशान किशननेही शतक साजरे केले.त्यामुळे एका षटकात भारताच्या दोन फलंदाजांनी शतक पूर्ण केल्याचे दुर्मीळ दृश्य पाहायला मिळाले.2023 च्या वनडे विश्वचषकानंतर भारतीय वनडे संघाबाहेर असलेल्या ईशान किशनने या मालिकेत पुनरागमन केले असून त्याने संधीचे सोने केले.चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ईशानने सुरुवातीला संयमी खेळी करत 52 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ईशानने अवघ्या 71 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.दोघांच्या शतकी खेळीमुळे भारताने मोठ्या धावसंख्येकडे दमदार वाटचाल केली आणि अफगाणिस्तानसमोर मोठे आव्हान उभे केले.