रोहित - कोहलीची लवकर एक्झिट ; केएल राहुलचं झंझावाती शतक
Cricket News - रजकोटमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने अप्रतिम शतकी खेळी साकारत भारतीय डावाला नवी दिशा दिली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर अपयशी ठरल्यानंतर राहुलने संघाची जबाबदारी समर्थपणे उचलली. हे राहुलचं एकदिवसीय कारकिर्दीतील आठवं शतक ठरलं. राहुलने केवळ 87 चेंडूत शतक पूर्ण करत भारतीय डावाला गती दिली. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 284 धावांचा भक्कम स्कोअर उभारला. राहुलने 92 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट 122 इतका होता. आपल्या आक्रमक डावात त्याने 12 चौकार आणि 1 षटकार लगावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.

भारताचे चार प्रमुख फलंदाज अवघ्या 118 धावांत बाद झाल्यानंतर राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आणि डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने रवींद्र जडेजासोबत 88 चेंडूत 73 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. त्यानंतर नितीश रेड्डीसोबत 49 चेंडूत 57 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला संयमी खेळ करणाऱ्या राहुलने शेवटच्या षटकांत वेग वाढवत धावांचा पाऊस पाडला. राहुल व्यतिरिक्त कर्णधार शुभमन गिलनेही 56 धावांची उपयुक्त खेळी केली.
केएल राहुलने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्याने 10 सामने खेळून 10 डावांत 85 पेक्षा जास्त सरासरीने 430 हून अधिक धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. राहुलने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 782 धावा केल्या असून, त्या यादीत न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुलच्या नावावर सात अर्धशतकेही आहेत.




