गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष; संजय राऊतांची बोचरी टीका, म्हणाले ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही काळापासून रखडलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे तर नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. महाजन समर्थकांमध्ये त्यामुळे उत्साहाचं वातावरण असून, भाजपकडून आज जल्लोष साजरा केला जाणार आहे. याच जल्लोषावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “निर्लज्ज लोक आहेत. पहिल्यांदाच पालकमंत्रिपद मिळालं का? असं काही आहे का? यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.पालकमंत्रिपदाच्या निर्णयावरूनही संजय राऊत यांनी सरकारला लक्ष्य केलं. “हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असं म्हणतात. पण दोन जिल्ह्यांचा वाद अमित शाह यांच्याकडे न्यायचा, पंतप्रधानांकडे जायचं. तडजोड झाली, मुंबईच्या भाषेत मांडवली झाली,” असं राऊत म्हणाले.
गिरीश महाजन यांच्याशी माझं व्यक्तिगत भांडण नाही. आमच्या मोर्चाच्या मुहूर्तावर हा निर्णय झाला. महाजन कुंभमेळा मंत्री आहेत. त्यांच्या कामाविषयी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत लोक प्रश्न विचारत आहेत, त्याची उत्तरं द्या, अशी टीकाही राऊत यांनी केली.पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकासाठी एक कोटी रुपये मंजूर करून आणा. पैसे खा, सरकारचे जावई पैसे खात आहेत. जो पैसे खाऊन काम करत नाही, त्याला भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर गिरीश महाजन यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. “पांडुरंग पावला...मी दर्शन घेत असताना बायकोने हळूच कानात मी नाशिकचा पालकमंत्री झाल्याची बातमी सांगितली. आज पत्नी आणि मतदारसंघातील 15 ते 16 हजार मतदारांसह पंढरपूरच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेतानाच ही बातमी कळली आणि खूप आनंद झाला,” असं महाजन म्हणाले.“आता यंदाचा महाकुंभ न भूतो न भविष्य, असा होईल. नाशिकचा चेहरा-मोहरा बदलून जाईल,” असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.




