'हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या; पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सांगतो'; रोहित पवारांचे उदय सामंतांना ओपन चॅलेंज
मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री दावा करत आहेत की 3 जून 2026 च्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक उद्योग, म्हणजेच 3 लाख 96 हजार उद्योग महाराष्ट्रात आहेत आणि गेल्या वर्षभरात 41 हजार 500 कंपन्या महाराष्ट्रात आल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगावं की 2014 नंतर प्रत्यक्षात किती कंपन्या महाराष्ट्रात आल्या आहेत? अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी उद्योग बंद पडण्यावरून सरकारवर निशाणा साधला.

जे भाजपचे नेते आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना ना विकास कळतो ना उद्योग समजतो. त्यांना मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशन किंवा रोबोटिक्स काय असतं हे माहित नाही. त्यांना फक्त जीप बाहेर काढायची आणि वरून येणाऱ्या आदेशांनुसार बोलायचं, एवढंच माहिती आहे, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार म्हणाले, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात की चाकणमधील कोणताही उद्योग बाहेर जाणार नाही आणि विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. आमचं त्यांना चॅलेंज आहे की, टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या. आम्ही पुराव्यांसकट आणि प्रेझेंटेशनसकट महाराष्ट्राची आजची आर्थिक परिस्थिती काय झाली आहे, हे मांडायला तयार आहोत, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री नेहमी म्हणतात की डेटा सेंटरमध्ये मोठी गुंतवणूक आली. मात्र, डेटा सेंटर बांधताना सिव्हिल कामापुरतेच लोक लागतात. एकदा का 2 हजार कोटी रुपये खर्च करून डेटा सेंटर तयार झालं, की तिथे केवळ 100 लोकांना नोकऱ्या मिळतात. डेटा सेंटर काय करतं? तर ते मोठ्या प्रमाणात वीज आणि पाणी वापरतं, पण त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत नाही. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आम्हाला डेटा सेंटर नकोत. आम्हाला असे उद्योग हवे आहेत, ज्यातून प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल.
रोहित पवार यांनी सांगितलं की, 2022 ते 2025 दरम्यान महाराष्ट्रातील एफडीआयमध्ये केवळ 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. याउलट इतर राज्यांमध्ये ही वाढ मोठी आहे. हरियाणामध्ये 49 टक्के, तमिळनाडूमध्ये 85 टक्के, तेलंगणामध्ये 88 टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 96 टक्के वाढ झाली आहे. यावर मुख्यमंत्री उत्तर देणार का? असा सवाल त्यांनी केला.
तुम्ही अनेकवेळा डावोसला जाऊन करार केले. मात्र, 10 बाय 10 च्या खोलीत कार्यालय असणारी कंपनी डावोसमध्ये जाऊन तुमच्यासोबत करार करते आणि सांगते की आम्ही 20 हजार लोकांना नोकरी देणार. प्रत्यक्षात अशा किती कंपन्यांनी तुमच्यासोबत करार केले आणि त्यापैकी किती कंपन्यांनी महाराष्ट्रात प्रत्यक्ष उद्योग सुरू केले, हे आकडे तुम्ही जाहीर करावेत, असं आव्हानही रोहित पवार यांनी दिलं.
रोहित पवार यांनी पुढे सांगितलं की, महाराष्ट्रातील अनेक कंपन्या राज्याबाहेर जात आहेत. कारण आपल्याकडे उद्योगांसाठीचा विजेचा दर म्हणजेच इंडस्ट्रियल रेट साडेबारा ते तेरा रुपये आहे, तर कमर्शियल दर 16 ते 17 रुपये आहे. याउलट शेजारच्या राज्यांमध्ये हाच दर साडेसात ते साडेआठ रुपये इतका कमी मिळतो. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना इतर राज्यांच्या तुलनेत मोठा खर्च सहन करावा लागत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.




