लोहगड हत्या प्रकरणात मध्यरात्री पोलिसांची 'क्राईम सीन रिक्रिएशन; आरोपी एकमेकांवरच ढकलत आहेत हत्येची जबाबदारी
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाला आणखी वेग दिला आहे. या तपासाचा महत्त्वाचा टप्पा म्हणून लोहगडावर मध्यरात्री 'क्राईम सीन रिक्रिएशन' करण्यात आले.

स्वतः पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल घटनास्थळी उपस्थित राहिले. केतन, सिया गोयल आणि चेतन चौधरी लोहगडावर आल्यानंतर नेमके कोणत्या मार्गाने गेले, सीसीटीव्हीमध्ये दिसलेला त्यांचा प्रवास आणि ज्या ठिकाणावरून केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे, त्या संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाची पाहणी आणि 'क्राईम सीन रिक्रिएशन' ही अत्यंत महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया असते. मृतदेह ज्या ठिकाणी आढळला, तो घटनास्थळापासून किती अंतरावर होता आणि संपूर्ण घटनाक्रम तांत्रिक पुराव्यांशी जुळतो का, याची पडताळणी करण्यात आली.
दरम्यान, पोलीस कोठडीत असलेले आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चौकशीदरम्यान एकमेकांवरच हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. चेतनच्या म्हणण्यानुसार हत्या करण्याचा आग्रह सियाने धरला होता, तर सियाने हा आरोप फेटाळून संपूर्ण योजना चेतनचीच असल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या मते, स्वतःवरील दोष कमी करण्यासाठी आरोपी अशा प्रकारचे परस्परविरोधी दावे करत असण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाला आता कायदेशीरदृष्ट्याही नवे वळण मिळाले आहे. सिया गोयलच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, प्रकरण अद्याप तपासाधीन असून त्यांची पक्षकार तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहे. तसेच, संविधानाने प्रत्येक आरोपीला न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




