१५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबद्दल गारगोटीत महायुती सरकारचे मानले आभार
गारगोटी (कोल्हापूर) : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत काम करणाऱ्या १५ हजार कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियमित कर्मचारी म्हणून सेवा समायोजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे एनएचएम अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने एका अनौपचारिक कार्यक्रमात महायुती सरकारचे जाहीर आभार मानण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा प्रश्न प्रलंबित होता. संघटना आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संवेदनशील निर्णयाचे स्वागत करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कृतज्ञता सोहळ्याला माजी आमदार उल्हास पाटील, मदन देसाई, कल्याण निकम तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष स्वप्निल गोसावी, सतीश सवदे, संजय पाटील, राहुल कोकणे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना प्रमुखांसह राज्यभरातील आरोग्यसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




