पाच तास झाडावर मृत्यूशी झुंज; झाडावर चढलेल्या नागांनाही हुसकावलं, जळगावातील नागरिकाचा थरारक अनुभव

पाच तास झाडावर मृत्यूशी झुंज; झाडावर चढलेल्या नागांनाही हुसकावलं, जळगावातील नागरिकाचा थरारक अनुभव

मुंबई (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चावलखेडा गावातील सुरेश भील यांनी पुराच्या पाण्यात अडकून तब्बल पाच तास झाडावर बसून मृत्यूशी झुंज दिली. पुराच्या वेढ्यासोबतच झाडावर चढलेल्या विषारी नागांचाही सामना करत त्यांनी अखेर सुखरूप सुटका करून घेतली. सुरेश भील हे नेहमीप्रमाणे नदीत मासेमारीसाठी गेले होते. मात्र, अचानक धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला आणि त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळच्या झाडावर चढून आश्रय घेतला.

मात्र संकट इथेच थांबलं नाही. पुरापासून बचाव करण्यासाठी काही विषारी नागही त्याच झाडावर चढले. खाली वेगाने वाहणारं पाणी आणि वर नागांचा धोका अशा दुहेरी संकटात सुरेश भील यांनी धैर्य न गमावता झाडाच्या फांद्या तोडून नागांना खाली पाण्यात ढकललं आणि स्वतःचा बचाव केला.

सुमारे पाच तासांनी पाण्याची पातळी कमी होताच त्यांनी पोहत सुरक्षित किनारा गाठला. सुटका झाल्यानंतर त्यांनी अहिराणी भाषेत गावकऱ्यांचे आणि प्रशासनाचे आभार मानले. तसेच धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी केल्याबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे विशेष आभार व्यक्त केले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे नारळी नदीला मोठा पूर आला. बहाळ, कुंझर, कळमडू, पोहरा आणि खेडगाव परिसराला या पुराचा मोठा फटका बसला. केळीच्या बागांसह अनेक पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी गुरेढोरेही वाहून गेल्याची माहिती आहे. बहाळ येथे एक घर कोसळले, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली असून, बाधित शेतकरी आणि नागरिकांनी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.