गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अपघाताने की घातपाताने?; उद्धव ठाकरेंपाठोपाठ नाना पटोलेंकडूनही चौकशीची मागणी
मुंबई : गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले पाहिजे, अशी मागणी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केली होती. या मुद्द्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाष्य केले आहे. मुंडेसाहेबांचा मृत्यू अपघाताने झाला की घातपाताने, असा सवाल करत सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, म्हणजे 'दूध का दूध, पानी का पानी' होईल, अशी आक्रमक भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे.

अजितदादांच्या मुद्द्यावरून आणि कुंभमेळ्यावरून निशाणा
पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, अजितदादांसदर्भात विधानसभेत सातत्याने भूमिका मांडली, पण साधा एफआयआर (FIR) सुद्धा दाखल होऊ शकला नाही, यामध्ये नक्की काय दडलंय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, उत्तर प्रदेशपेक्षा सहा पटीने अधिक पैसा कशासाठी आणि का खर्च केला जात आहे? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.
कर्नाटक पॅटर्नचा संदर्भ देत सरकारवर टीका
उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावलेल्या 'तुमसे नाहो पायेगा' या भूमिकेचे समर्थन करत पटोले म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून तिथे १५ दिवसांच्या आत दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवातही झाली. मात्र, महाराष्ट्रात ९५ टक्के भागात पाऊस नसतानाही सरकार केवळ नियमांचा हवाला देत आहे. मग अशा डबल इंजिन सरकारचा फायदा काय? अशी घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.




