धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 20 ला दिल्ली मोर्चा; अभिजीत दिपकेंनी रणशिंग फुंकलं

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 20 ला दिल्ली मोर्चा; अभिजीत दिपकेंनी रणशिंग फुंकलं

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली ६ जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आज पुण्यातही पक्षाकडून आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिजित दीपके यांनी आज (११ जून) पुण्यात पत्रकार परिषद घेत आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. येत्या २० जून रोजी दिल्लीत आणखी मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील आंदोलनात पुणे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांची तयारी करणारे युवक सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. “२० जून रोजी सर्व विद्यार्थ्यांनी दिल्लीला यावे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यातील आंदोलनाबाबत बोलताना दीपके म्हणाले की, आज संध्याकाळी शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवला जाणार आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“पुणे हे शिक्षणाचे केंद्र आहे आणि माझ्यासाठी ते होम ग्राउंडसारखे आहे. यानंतर आम्ही नागपूरमध्येही आंदोलन करणार आहोत. सरकारसोबत चर्चेसाठी आम्ही तयार आहोत; मात्र आमची सोशल मीडिया अकाउंट्स बंद केली जात आहेत, ही योग्य पद्धत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. तसेच पुण्यातील आंदोलन जंतर-मंतरवरील आंदोलनापेक्षा अधिक मोठे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कॉकरोच जनता पार्टीचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे हा असून या चळवळीला ‘फेक’ म्हणून हिणवू नये, असे दीपके म्हणाले. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही लढाई सुरू असून गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही आंदोलन केले जाईल. मात्र सध्या शिक्षण क्षेत्रातील समस्या हा प्रमुख मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “२० जून रोजी सर्वांनी दिल्लीला यावे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटू नये,” असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले.