मुलांना माफ करतो" म्हणणाऱ्या पंतप्रधानांवर संजय राऊतांचा पलटवार; ही अवदसा आठवते तरी कशी?

मुलांना माफ करतो" म्हणणाऱ्या पंतप्रधानांवर संजय राऊतांचा पलटवार; ही अवदसा आठवते तरी कशी?

मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे रात्रीच्या वेळी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. काल शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा उल्लेख केला. मात्र, मला त्या मुलांना माफ करायचं आहे. देश पुढे जात आहे, मुलांनीही पुढे यावं, आपण त्यांच्यासोबत काम करू, असेही पंतप्रधान म्हणाले. या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले, "हे कोण माफ करणारे? ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात त्या मुलांनी त्यांच्याकडे माफीच मागितलेली नाही. आम्ही कोणी तुमच्याकडे माफी मागितली आहे का? ही अवदसा तुम्हाला आठवते तरी कशी? देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे मनाने आणि विचाराने भरकटलेले आहेत. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलण्याची गरज आहे. तुम्ही मुलांना माफ करत आहात, तर मग शेकडो विद्यार्थ्यांचे चारित्र्य कशाला तपासत आहात?"

राऊत यांनी पुढे चंद्रकांत पाटील यांच्यावरही उपरोधिक टीका केली. चंद्रकांतदादा पाटील दगडांचे ठसे घ्यायला गेले आहेत. त्यांनी तिथे कोरीव काम सुरू केले आहे. मला सांगण्यात आलं की, काल ते ट्रक घेऊन गेले होते. अमित शाह यांनी त्यांना दगड गोळा करण्याची जबाबदारी दिली आहे. आता डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना लोक विसरतील आणि संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार चंद्रकांत पाटील यांनाच द्यावा लागेल, असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत पुढे म्हणाले, पंतप्रधानांना मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. आपण यापूर्वी अनेकांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते, ते विसरत आहात का? कोणीही तुमच्या आई-बहिणीबद्दल काही बोललेलं नाही. तो विद्यार्थ्यांच्या भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने देश चालवला जात आहे, ती हुकूमशाही आहे. त्याविरोधात तरुण रस्त्यावर उतरले असतील, तर त्यात आश्चर्य नाही. 2014 मध्ये याच तरुणांच्या मदतीने तुम्ही सत्तेत आलात. राज्यकर्त्याला त्याच्या कामानुसार प्रेम, पाठिंबा आणि टीका—सगळंच मिळत असतं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, अमित शाह एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाहीत आणि बाहेर पुण्यात दौरे करत आहेत. हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. संसदेत अँटी पेपर लीक विधेयकावर चर्चा सुरू असताना गृहमंत्री अनुपस्थित आहेत. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं, पण सरकार त्यांचं संरक्षण करू शकलं नाही. उलट न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, खिळे लावलेल्या लाठ्या आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला. या विषयावर चर्चा सुरू असताना अमित शाह सभागृहातून निघून गेले. हे नैतिक अधःपतन आणि डरपोकपणाचं उदाहरण आहे," असा आरोपही त्यांनी केला.