सलाईन सोडली की सरकारला टेन्शन येतं! बीडमध्ये रात्री २ वाजता जरांगेंनी तोफ डागली
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईच्या दिशेने दौरा सुरू आहे. बीडच्या पाटोदा येथे मुक्कामी असताना मनोज जरांगे यांनी चक्क रात्री २ वाजता सभा घेऊन समर्थकांशी संवाद साधला. आरोग्याची साथ मिळत नसली तरी आरक्षण मिळवल्याशिवाय माघार घेणार नाही, असा घणाघाती इशारा देत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सलाईन सोडली की सरकारला टेन्शन
सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "सलाईन घेतली की सरकार बिनधास्त होतं, पण सलाईन सोडली की त्यांना टेन्शन येतं! ज्याला कोणी वस्ताद नाही, त्याचा बाप मी आहे; मी चांगल्या चांगल्यांची जिरवली आहे." उपोषणामुळे तब्येत खालावत असल्याने पुढील दौरा करणे कठीण होत आहे. गरज पडल्यास पोलिसांना सांगून पाटोद्यातूनच थेट मुंबई गाठेन, असा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी आरक्षणावर उपस्थित केला प्रश्न
पश्चिम महाराष्ट्रातील फळबागांचे उदाहरण देत जरांगेंनी सरकारला सवाल केला, "सरकार म्हणतं पश्चिम महाराष्ट्रात फळबागा आहेत, मग त्या फळबागा काय ओबीसींकडे नाहीत का? मग त्यांना आरक्षण कशाला?" असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
"माझ्या मागे येऊ नका, एकट्याला जाऊ द्या
समर्थकांना आवाहन करताना जरांगे म्हणाले, "माझी सर्वांना विनंती आहे, लढायला शिका. आपण घाबरणारे नाही, खचणारे नाही. सर्वांची लेकरं एसीमध्ये बसली आहेत, पण मी तुमच्या लेकरांसाठी लढत आहे. आता कोणी माझ्या मागे येऊ नका, मला एकट्याला मुंबईला जाऊ द्या; राज्य सरकारमध्ये किती दम आहे ते मला पाहायचे आहे."
खालावलेल्या आरोग्याची दिली माहिती
पोषणाचा १८ वा दिवस असल्याने शरीराला प्रचंड त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. "१२ तारखेला सलाईन काढल्यापासून पुन्हा त्रास सुरू झाला आहे, आता हातपाय हलवणेही कठीण झाले आहे. पण तुमच्या लेकरांच्या भविष्याशिवाय माझ्यासाठी काहीही महत्त्वाचे नाही," असे सांगत त्यांनी मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले.




