खड्ड्यांमुळे चाकण MIDC मधील उद्योजक हैराण; 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत, उदय सामंत चाकणमध्ये जाणार

खड्ड्यांमुळे चाकण MIDC मधील उद्योजक हैराण; 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत, उदय सामंत चाकणमध्ये जाणार

मुंबई (प्रतिनिधी) : खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या चाकण MIDC मधील काही कंपन्या औद्योगिक वसाहत सोडण्याच्या तयारीत आहेत. तब्बल 20 लघुउद्योजकांनी स्थलांतराचा निर्णय घेतल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्येही सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

रस्त्यांच्या समस्येमुळे चाकणमधील काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रोजगारावरही परिणाम होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चाकण MIDC मधील उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या प्रत्यक्ष जाणून घेऊन मार्ग काढण्यासाठी येत्या 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता उद्योगमंत्री उदय सामंत स्वतः चाकणमध्ये जाणार आहेत. यावेळी ते उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत तरी समस्यांवर तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथील उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांच्या अडचणी दूर करणे याला शासनाचे प्राधान्य असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.रस्ते, वाहतूक तसेच इतर पायाभूत सुविधांबाबत उद्योजकांच्या असलेल्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयातून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चाकणमधील औद्योगिक संघटनांनीही उद्योगमंत्र्यांसोबत होणारी चर्चा सकारात्मक पद्धतीने करण्याचे आश्वासन दिले आहे. उद्योग महाराष्ट्रातून स्थलांतरित होण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच विद्यमान उद्योगांचे संरक्षण करून चाकण परिसरातील रोजगाराच्या संधी कायम राहाव्यात, यासाठी शासन आणि औद्योगिक क्षेत्राच्या समन्वयातून मार्ग काढला जाणार आहे.चाकणच्या औद्योगिक विकासाला गती देतानाच उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. संबंधित सर्व घटकांशी संवाद साधून ठोस निर्णय घेतले जातील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.