NEET पेपरफुटी आंदोलनावरून संजय राऊतांचा सरन्यायाधीशांना खोचक टोला
मुंबई (प्रतिनिधी) : NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र हिंसक वळण लागलं आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर दिल्लीतील वातावरण चांगलंच तापलं असून, याचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि सरन्यायाधीशांवर जोरदार निशाणा साधला आहे. "देशातील मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार!" अशा उपरोधिक शब्दांत राऊतांनी टोला लगावला आहे.

नवी दिल्लीतील आजच्या विराट आंदोलनाचे श्रेय सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जाते, असे म्हणत संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर आणि सरकारवर कडाडून टीका केली. एकीकडे जंतर-मंतरवर पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरले असताना, दुसरीकडे आंदोलकांचा एक मोठा गट संसद भवनाजवळ धडकला आहे. संसद भवनापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर हा मोर्चा पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली आहे. जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी दावा केला आहे की, संसद परिसरात तब्बल ७५,००० आंदोलक जमा झाले होते.
NEET पेपरफुटीविरोधात CJP आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने आधी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले, तर दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान, अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा सीजेपीने केला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने दिल्लीत सध्या अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुसरीकडे, आंदोलक नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर सौरव दास यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, "दोन तास वाट पाहिल्यानंतर जे. पी. नड्डा यांच्याशी १० मिनिटे चर्चा झाली. आम्ही आमच्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले असून त्यांनी पुढील चर्चेचे आश्वासन दिले आहे." मात्र, एकीकडे चर्चेचे आश्वासन दिले जात असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर आंदोलकांची धरपकड सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि आंदोलकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.




