"जयंत पाटील-विनोद तावडे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; महायुतीबाबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी दिली स्पष्ट प्रतिक्रिया"
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात मुंबईत झालेल्या भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र, या भेटीत केवळ अनौपचारिक चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भविष्यात महायुतीत सहभागी झाल्यास संभाव्य राजकीय समीकरणांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या भेटीनंतर जयंत पाटील यांनी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याशीही संवाद साधल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीबाबत मला माहिती नाही. आम्हीही विविध संसदीय समित्यांमध्ये एकत्र काम करतो. गेल्या महिन्यात माझी आणि विनोदजींची अनेकदा भेट झाली आहे. अशा भेटींना राजकीय अर्थ लावण्याचे कारण नाही."
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही महायुतीत जाण्याच्या चर्चांचे खंडन केले. "अशी कोणतीही चर्चा आमच्या पक्षात सुरू नाही. या केवळ अफवा आहेत. आमचा पक्ष अनेक वर्षे भाजपच्या विरोधात भूमिका घेत आला आहे. सध्या आमचे लक्ष शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले, तरी संबंधित नेत्यांकडून कोणताही राजकीय निर्णय किंवा आघाडीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.




