पंढरपुरात आजपासून 'व्हीआयपी' दर्शन बंद; नियम मोडल्यास थेट फौजदारी गुन्हे

पंढरपुरात आजपासून 'व्हीआयपी' दर्शन बंद; नियम मोडल्यास थेट फौजदारी गुन्हे

 पंढरपूर: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. ऊन, वारा, पावसाची तमा बाळगता पायी चालत येणाऱ्या सामान्य भाविकांना देवाचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी आजपासून (१५ जुलै) विठ्ठल-रखुमाईचे 'व्हीआयपी' (VIP) दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तसेच उद्यापासून (१६ जुलै) सावळ्या विठुरायाचे दर्शन २४ तास सुरू राहणार आहे.

आषाढी यात्रेच्या पवित्र वातावरणाचे पावित्र्य राखण्यासाठी आजपासून पंढरपूर शहरात मांस विक्रीवरही कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे.

२९ जुलैपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी वारीच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ जुलै ते २९ जुलै या यात्रा कालावधीत कोणत्याही लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी किंवा मंदिर समिती सदस्यांच्या शिफारस पत्राद्वारे व्हीआयपी प्रवेश दिला जाणार नाही.

"नियम मोडल्यास थेट गुन्हा!"

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कोणालाही मागच्या दाराने किंवा व्हीआयपी पद्धतीने प्रवेश दिल्यास, संबंधित व्यक्तीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

सीसीटीव्ही आणि अधिकाऱ्यांचा कडक पहारा

या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले असून, विशेष लक्ष ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, पोलीस आणि पत्रकार अशा सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींनी व्हीआयपी दर्शनाचा आग्रह धरता रांगेतून, मुख दर्शन किंवा कळस दर्शन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले आहे.

संतांच्या पालख्या पंढरीच्या समीप!

सर्व प्रमुख संतांचे पालखी सोहळे आता पंढरपूरच्या अगदी जवळ आले असून, अवघी पंढरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. लाखो भाविक देवाचे पददर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहत असल्याने, उद्यापासून सुरू होणाऱ्या २४ तास दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय नियोजनाची आता प्रत्यक्ष कसोटी सुरू झाली आहे.