उद्धव साहेबांमुळेच इथपर्यंत पोहोचलो"; ओमराजेंचा जुना व्हिडीओ चर्चेत

उद्धव साहेबांमुळेच इथपर्यंत पोहोचलो"; ओमराजेंचा जुना व्हिडीओ चर्चेत

मुंबई (प्रतिनिधी) : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत केलेले वक्तव्य पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे.

एका कार्यक्रमात ऑपरेशन टायगर संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला होता. "मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. 2009 पूर्वी माझी काय ओळख होती? ग्रामपंचायतीची निवडणूकही न लढलेल्या मला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली. त्यांच्यामुळेच मला राजकारणात संधी मिळाली," असे ते म्हणाले होते.

पुढे बोलताना त्यांनी, "एकदा आमदार आणि दोन वेळा खासदार होण्याची संधी मला मिळाली, ती उद्धव ठाकरे यांच्या विश्वासामुळेच. केवळ स्वार्थ, सत्ता किंवा इतर कोणत्याही कारणासाठी मी त्यांची साथ सोडली तर लोकांशी नजर मिळवणे कठीण होईल," असेही म्हटले होते.

दरम्यान, हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. धाराशिवमधील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनीही यावर प्रतिक्रिया देत, पक्षाशी निष्ठा राखण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांना मोठ्या संधी दिल्या असून, त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यास कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, असे मत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.