नूतनीकरण झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा मानकरी ठरला स्वच्छता कर्मचारी वर्ग; १५ ऑगस्ट रोजी होणार विशेष सन्मान

नूतनीकरण झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा मानकरी ठरला स्वच्छता कर्मचारी वर्ग; १५ ऑगस्ट रोजी होणार विशेष सन्मान

कोल्हापूर : ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतरचा पहिलाच मानाचा कार्यक्रम महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नुकत्याच पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या विशेष निर्देशानुसार उद्या शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी वाजता या दिमाखदार नाट्यगृहात स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शहर स्वच्छतेची अविरत आणि महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे चीज करण्याबरोबरच त्यांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या निमित्ताने मिळणार आहे.

कृतज्ञतेचा सोहळा
नव्या रूपात आणि अत्याधुनिक सुविधांसह सज्ज झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची सुरुवात समाजाच्या विकासात अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या गौरवार्थ होत असल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमास महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व स्वच्छता कर्मचारी अधिकाऱ्यांनी शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी केले आहे.