'६ महिन्यांनंतर शोधूनही सापडणार नाही सीजेपी'; भाजपचे ज्येष्ठ नेते बृजभूषण शरण सिंह यांचे मोठे भाकीत

'६ महिन्यांनंतर शोधूनही सापडणार नाही सीजेपी'; भाजपचे ज्येष्ठ नेते बृजभूषण शरण सिंह यांचे मोठे भाकीत

दिल्ली : 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) या डिजिटल आणि व्यंग्यात्मक राजकीय पक्षाबाबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा कुस्ती महासंघाशी संबंधित माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी मोठे भाकीत केले आहे. आगामी सहा महिन्यांनंतर हा पक्ष शोधूनही सापडणार नाही, असा दावा त्यांनी एका वाहिनीवरील मुलाखतीत केला आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन सीजेपीने हायजॅक केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

 

सीजेपीची नवी मोहीम आणि छत्रपती संभाजीनगर बैठक 
कॉक्रोच जनता पार्टीकडून येत्या काळात देशभरात ‘क्या बोलती पब्लिक?’ ही विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. संपूर्ण देश ढवळून काढण्यासाठी आणि एक दबाव गट तयार करण्याच्या उद्देशाने नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे सीजेपीची महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. हा पक्ष थेट निवडणूक राजकारणात उतरणार नसला, तरी लोकांचे प्रश्न समजून घेऊन एक प्रभावी दबाव गट म्हणून काम करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले आहे. 

"विद्यार्थ्यांचे आंदोलन सीजेपीने हायजॅक केले"
या पार्श्वभूमीवर बोलताना भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी सीजेपीवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या न्याय्य होत्या; परंतु सीजेपीने या चांगल्या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण दिले, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनाला बदनाम करण्यामागे आणि ते भरकटवण्यामागे सीजेपीचाच हात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, जर हे आंदोलन केवळ तरुणांचे असते, तर वाहनांची नासधूस झाली नसती, असे सांगत त्यांनी डाव्या-उजव्या विचारसरणीच्या लोकांनी हा लढा हायजॅक केल्याचे म्हटले. 

"सीजेपीचे कोणतेही राजकीय भविष्य नाही"
कॉक्रोच जनता पार्टीला सल्ला देताना बृजभूषण सिंह म्हणाले की, त्यांनी स्वतःला फार मोठे समजण्याच्या भ्रमातून बाहेर आले पाहिजे. या डिजिटल पक्षाची प्रत्यक्षात कोणतीही किंमत किंवा भविष्य नाही. येत्या सहा महिन्यांत हा पक्ष शोधूनही कुठे सापडणार नाही. हिंमत असेल तर पक्षाने प्रत्यक्ष निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हानही त्यांनी सीजेपीच्या नेत्यांना दिले.