Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल-गाळ फासला; चपला आणि दगडही फेकले, दीदी म्हणाल्या, ‘खिडकी उघडी असती तर माझं डोकं फुटलं असतं
मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जमावाने पोलिसांसमोरच त्यांची कार थांबवून त्यावर चिखल आणि गाळ फासला. काही जणांनी चपला आणि दगडही फेकल्याचा आरोप आहे. जर कारची खिडकी उघडी असती, तर दगड लागून त्यांचे डोके फुटले असते आणि त्यात मृत्यूही झाला असता, असा गंभीर आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

टीएमसी कार्यकर्त्याच्या निधनानंतर ममता बॅनर्जी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या. यावेळी बिजापूरजवळ स्थानिक जमावाने ‘चोर, चोर’ अशा घोषणा देत त्यांचा ताफा अडवला. त्यानंतर त्यांच्या कारवर चिखल, गाळ आणि दगडफेक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “माझ्या गाडीवरील हल्ला हा एक कट आहे. मी इथे येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती, तरीही पोलिसांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली नाही. संपूर्ण पश्चिम बंगाल गुंडांच्या ताब्यात आहे.”
तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) कार्यकर्ते बिरजू केओट यांच्या निधनानंतर ममता बॅनर्जी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आल्या होत्या. हलीशहर पोलीस कोठडीत असताना प्रकृती खालावल्याने बिरजू यांचे निधन झाले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “तुम्ही (टीएमसीने) इतकी चोरी केली आहे की, जनतेने तुम्हाला चोर म्हटले पाहिजे.” आर. जी. कार मेडिकल कॉलेजमधील पीडितेच्या मृत्यूच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त ममता बॅनर्जी यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट का घेतली नाही, असा सवालही सुवेंदू अधिकारी यांनी केला.
अधिकारी म्हणाले, “तुम्ही आज पीडितेच्या घरी जाऊ शकला असता. तुम्ही गळ्यात टॉवेल गुंडाळून रत्ना देबनाथ यांच्याकडे जाऊन, तुमच्याकडून चूक झाली आणि तुम्हाला वाईट वाटत आहे, असे सांगून माफी मागू शकला असता. मला खात्री आहे की त्यांनी तुम्हाला माफ केले असते.”
दरम्यान, 8 जुलै रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे टीएमसीच्या रॅलीतही गोंधळ झाल्याची घटना घडली होती. ममता बॅनर्जी संतापल्या आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांना कानशिलात मारल्याचे दिसले. बारुईपूरमध्ये एका 11 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती.
यावेळी ‘चोर, चोर’ अशा घोषणा देण्यात आल्या, तर काही लोकांनी रॅलीतील सहभागी व्यक्तींवर अंडी फेकण्यास सुरुवात केली. भाजप कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला आणि शारीरिक हिंसाचारही केला, असा आरोप टीएमसीकडून करण्यात आला. बंगालमध्ये अराजकता पसरली असून पोलीस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
4 मे रोजी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना ममता बॅनर्जी यांनीही गंभीर आरोप केले होते. मतमोजणी केंद्राच्या आत आपल्यावर हल्ला करण्यात आला, मारहाण आणि ढकलाढकली करण्यात आली, असा दावा त्यांनी केला होता. तसेच, सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
दुसरीकडे, मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची Z+ सुरक्षा कायम असल्याचे सांगितले जात आहे. मे 2026 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेरील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आला, मात्र Z+ सुरक्षा हटवण्यात आलेली नाही. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांच्या Z+ सुरक्षेत अंदाजे 55 जवानांचा समावेश असतो.




