शरद पवारांच्या भेटीनंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह PM मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

शरद पवारांच्या भेटीनंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह PM मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच आज (10 ऑगस्ट) दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी भेट घेतली. या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. जवळपास अर्धा तास ही बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्या. काही भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही ठिकाणी अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही. याशिवाय पिकांच्या किमती आणि विकासाशी संबंधित प्रश्नही खासदारांनी पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकूण 8 खासदार उपस्थित होते. खासदारांनी आपल्या मतदारसंघातील समस्या पंतप्रधानांकडे मांडल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

याच बैठकीदरम्यान राष्ट्रवादीकडून महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कवी अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणीही करण्यात आल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, ही भेट वरवर पाहता मतदारसंघातील प्रश्नांसाठी झालेली दिसत असली, तरी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

कालसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा मुंबई ते कोल्हापूर असा एकत्र विमान प्रवास झाल्याची चर्चा होती. त्याचबरोबर जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपदाचा प्रस्ताव असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रवादीकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत थेट चर्चा करण्याचे संकेत दिले जात आहेत का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, लोकसभेतील पुढील काही दिवस राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा नव्याने आणण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याची चर्चा आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राजकीय फोडाफोडी सुरू असल्याचे बोलले जात असून, यामध्ये शरद पवारांच्या खासदारांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेटही त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. आता त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या खासदारांची मोदींसोबत झालेली ही बैठक आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने किती महत्त्वाची ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.