बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
मुंबई (प्रतिनिधी) : वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला आहे. "बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला आहे. माझा कोणत्याही व्यक्तीशी वाद नाही. मात्र, जनतेला गृहीत धरून जनता सहन करेल, असा समज ठेवून कोणी नाटक करत असेल, तर त्या नाटकाचा तमाशा काय आहे, हे दाखवण्याचं काम गणेश नाईक करेल," अशी खरमरीत टीका नाईक यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सानपाडा येथील कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक म्हणाले की, "कॉलनीमध्ये 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पुनर्बांधणी ही पुनर्विकासाऐवजी क्लस्टर योजनेतून होत असेल, तर ते या शहरासाठी फार घातक आहे. स्वतःच्या फायद्यासाठी यांनी बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेला आहे. कॉलनी भागातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना लागू करणे म्हणजे बिल्डरांच्या घशात पैसे घालण्यासारखे आहे. मात्र, कुणी असा प्रयत्न केला तर त्यांच्या घशातून पैसे काढण्यात येतील," असा इशारा त्यांनी दिला.
पुढे बोलताना नाईक म्हणाले की, "जनतेला गृहीत धरून कुणी नाटक करणार असेल, तर त्या नाटकातील तमाशा काय आहे, हे माझ्याकडून जनतेला दाखवण्यात येईल. आम्हाला बुद्धू समजून टपली मारणार असाल, तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद माझ्यात आहे," असा थेट इशाराही त्यांनी दिला.
गणेश नाईक यांच्या या वक्तव्याबाबत विचारले असता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. "मंत्र्यांकडे डेटा खूप येत असतो, त्यामुळे कदाचित हे खरं देखील असू शकतं. एकनाथ शिंदेंनी दहा वर्षांत काय, तर कितीतरी शेकडो वर्षे माणुसकीला मागे नेलेलं आहे. केस लागली की दरेगावला का पळतात, याचा आपण विचार केला पाहिजे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. "गणेश नाईक यांनी आता थांबले पाहिजे. आपण महायुतीमध्ये सोबत आहोत आणि एकत्र काम करत आहोत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर आज गणेश नाईक साहेब मंत्रीदेखील नसते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे," असं योगेश कदम म्हणाले.
तसंच, "देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगले संबंध आहेत. महायुतीमध्ये कुठेही कटुता निर्माण होऊ नये, याची जबाबदारी गणेश नाईक यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं बोलणं थांबवावं. त्यांच्या मनातील जी काही खदखद असेल, ती त्यांनी वरिष्ठांकडे मांडावी आणि ती कायमस्वरूपी संपवावी," अशी विनंतीही योगेश कदम यांनी केली.




