देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज भेट; सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार
मुंबई (प्रतिनिधी) : देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज भेट आज सकाळी होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आठ खासदार आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसदेत ही भेट होणार आहे. राज्यातील काही भागांतील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या भेटीत राजकीय चर्चा होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढील आठवड्यात संसदेत डिलिमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना, दुसरीकडे शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधानांसोबत भेट होत असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, या भेटीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भेटीगाठींमध्ये काहीतरी शिजतंय, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर कुणीही महाविकास आघाडी सोडणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
दिल्लीतील संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयकं सादर करणार आहेत. यामध्ये केरळ राज्याचे नाव बदलून ‘केरळम’ करण्याची तरतूद असलेले विधेयक आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक यांचा समावेश आहे.
दरम्यान, दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जप्रकरणी अमित शाह यांनी संसदेत निवेदन द्यावं, या मागणीवरून विरोधकांकडून गेल्या दोन आठवड्यांपासून संसदेत गदारोळ सुरू आहे. त्यामुळे आज संसदेचं कामकाज सुरळीत पार पडणार की पुन्हा गोंधळातच दिवस जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




