देवाभाऊंनी दिल्ली गाठावी, महाराष्ट्राची धुरा शिंदेंकडे द्यावी; बच्चू कडूंची मोठी राजकीय भूमिका

देवाभाऊंनी दिल्ली गाठावी, महाराष्ट्राची धुरा शिंदेंकडे द्यावी; बच्चू कडूंची मोठी राजकीय भूमिका

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला तोंड फुटलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत मोठं विधान करत नवा राजकीय चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला वाटतं की राज्यातील एखाद्या नेत्याने देशाचं नेतृत्व करावं. एकेकाळी मराठ्यांचा देशभर प्रभाव होता. त्याच भावनेतून देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय राजकारणात जाऊन देशाची जबाबदारी सांभाळावी, अशी अपेक्षा अनेकांची आहे.

कडू पुढे म्हणाले, जर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीची वाट धरली, तर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली पाहिजे. कारण महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिंदे यांनी केलेल्या बंडाची मोठी भूमिका होती. त्यामुळे केवळ संख्याबळ नव्हे, तर नैतिकतेचाही विचार व्हायला हवा, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर बच्चू कडूंनी टोला लगावत, "संजय राऊत यांची अनेक भाकितं आजवर खरी ठरलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणत्या ज्योतिषाचा सल्ला घेतला, हेच आधी तपासायला हवं," अशी उपरोधिक टिप्पणी केली.

बच्चू कडू म्हणाले, "देशात देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, अशी नेतृत्वाची मांडणी झाली तर ती योग्य ठरेल," अशी त्यांची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.याचवेळी त्यांनी बोगस बियाण्यांच्या प्रश्नावरही सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. "बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्याचं एक संपूर्ण वर्ष उद्ध्वस्त होतं. त्यामुळे अशा कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, अगदी जन्मठेपेची शिक्षाही विचारात घ्यावी," अशी मागणी बच्चू कडूंनी केली.