टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा- देवेंद्र फडणवीस
मुंबई (प्रतिनिधी) : मध्य पूर्वेतील सध्याच्या संकटावर, अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारावर तसेच टॅरिफ (कर) मुद्द्यावर केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भूमिकेवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार हल्लाबोल केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प हे 'हुकूमशहा' असून नरेंद्र मोदी त्यांचे 'गुलाम' असल्याची टीका खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेली, त्यांना देश कसा चालवायचा, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत कुठलीही माहिती नाही. मोदीजींनी भारताची उर्जा सुरक्षा जपली आहे नाहीतर भारताची काय हालत झाली असती हे आपल्याला माहिती आहे. मोदीजींनी दाखवून दिले की, जेव्हा टॅरिफ वॉर झाला तेव्हा भारत झुकला नाही. भारत कणखरपणे उभा राहिला. भारताने त्याचा सामना केला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ अॅग्रीमेंट केले, त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांना देखील मागे हटावे लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी अशा प्रकारचं भाष्य करणे हास्यास्पद असल्याचा पलटवार त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर केलाय.
दरम्यान, आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा तिरंगा फडवला आहे. न्यूझीलंडचा पराभव भारताने केला आहे. अंतिम सामन्यात अशा पद्धतीने स्कोअर करणं आणि समोरच्याला गारद करणं हा देखील एक रेकॉर्ड आहे. संजू सॅमसन, अभिषेकने चांगली बॅटिंग केली. बुमराह, अर्शदीपनं चांगली बॉलिंग केली. अर्थातच एकूण टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. सुर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. मुंबईच्या खेळाडूंनी देखील उत्तम खेळ खेळला. सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. आम्ही आज अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत. विधानसभा आणि विधान परिषद टीम इंडियाचे अभिनंदन करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.




