विलास घुले प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; न्यायासाठी CBI चौकशीची मागणी

विलास घुले प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; न्यायासाठी CBI चौकशीची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात मुख्य आरोपींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी मयत विलास घुले यांच्या आई आशाबाई घुलेही उपस्थित होत्या.

पत्रकार परिषदेत आशाबाई घुले यांनी खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांच्यावर गंभीर आरोप केले. मृत्यूपूर्वी विलास घुले यांनी दिलेल्या माहितीसह काही साक्षीदारांच्या जबाबांमध्ये त्यांचे नाव असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, तक्रारीतून नावे काढण्यासाठी दबाव आणला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवरही टीका केली. देशमुख प्रकरणात जशी तत्परता दिसली, तशी घुले प्रकरणात का दिसत नाही? आम्ही मराठा नाही म्हणून न्याय मिळत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सदावर्ते यांनी घुले प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी करत, गरज भासल्यास घुले कुटुंबाला मोफत कायदेशीर मदत देण्याची तयारीही दर्शवली. तसेच, तपासात निष्काळजीपणा झाल्यास वंजारी आणि ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

याशिवाय, त्यांनी एफडीएच्या कारवाईबाबत तुकाराम मुंढे यांचे समर्थन करत पंचतारांकित हॉटेलांवरील कारवाई कायद्यानुसार असल्याचे म्हटले. अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनाबाबतही त्यांनी उपरोधिक भाष्य केले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप हे संबंधित व्यक्तींचे दावे असून, त्याबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.