महिलांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा : पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात

महिलांनी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा : पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे संस्थेच्या दिवंगत सचिव ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगीताई गावडे यांच्या ५४ व्या जयंतीनिमित्त "महिलांची सुरक्षितता आणि स्वसंरक्षण " या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक मयूश्वरी खरात यांनी विद्यार्थिनींना महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेले कायदे, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, हेल्पलाईन सेवा, आत्मसंरक्षणाचे महत्त्व तसेच संकटाच्या प्रसंगी योग्य ती कायदेशीर पावले कशी उचलावीत याविषयी सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत प्राचार्या ज्ञानज्योती शुभांगीताई गावडे यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्स्टिट्यूटचे  प्राचार्य डॉ. सुहास सपाटे होते. 

पोलीस उपनिरीक्षक खरात म्हणाल्या, "महिलांची सुरक्षितता ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. कायद्याचे ज्ञान, आत्मविश्वास आणि प्रसंगावधान या तीन गोष्टी प्रत्येक मुलीची सर्वात मोठी ताकद आहेत. कोणत्याही प्रकारचा छळ, अत्याचार किंवा सायबर गुन्हा लपवून न ठेवता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यास योग्य वेळी न्याय मिळू शकतो.दिवंगत सचिव ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम त्यांच्या समाजाभिमुख कार्याला अभिवादन करणारा आहे." यावेळी त्यांनी काही प्रत्यक्ष अनुभव सांगितले. 

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सुहास सपाटे म्हणाले, "शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थिनींना सुरक्षित, सजग आणि कायद्याबाबत जागरूक नागरिक म्हणून घडविणे ही इन्स्टिट्यूट आपली सामाजिक जबाबदारी समजते." यावेळी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन लाभले.  संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी नियोजन केले. कार्यक्रमास प्रा. डॉ. करण पाटील,  शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रा.आरती चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. गीता साळोखे यांनी आभार मानले .