गुणवत्ता, संस्कार आणि कौशल्य यांचा समन्वय म्हणजे शरद इन्स्टिट्युट - गणेश शिंद

गुणवत्ता, संस्कार आणि कौशल्य यांचा समन्वय म्हणजे शरद इन्स्टिट्युट - गणेश शिंद

यड्राव ( प्रतिनिधी ) :“विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी, आई-वडिलांची मान उंचावण्यासाठी आणि स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आपल्या गुणवत्तेतील वेगळेपण ठळकपणे दाखवून दिले पाहिजे. आपले ध्येय स्पष्ट दृष्टीक्षेपात ठेवून काळानुसार बदल स्वीकारले नाहीत, तर अपयश अटळ आहे. संस्काराधिष्ठित व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बाबतीत शरद इन्स्टिट्युट नेहमीच अग्रेसर राहिले असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक भान, नैतिक मूल्ये आणि व्यावसायिक कौशल्य घडविण्यावर संस्थेचा विशेष भर आहे.” असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. 

ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते. 

 शिंदे म्हणाले, संत गाडगे बाबा म्हणत असत की, देव पाहायचा असेल तर पंढरपूरला जाऊ नका, साताऱ्याला जा आणि कर्मवीरांना बघा. आज त्याच विचारांची प्रचिती बागणे साहेबांच्या कार्यातून येते. गोरगरीब, कष्टकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे आयुष्य घडविण्याचे पवित्र कार्य ते करीत आहेत.

ते पुढे म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे. शिक्षण घेत असताना वडिलांच्या डोळ्यातील अपेक्षा व आई-वडिलांचे कष्ट ओळखायला हवेत. ज्ञान समाजाभिमुख असावे, सामाजिक भान व जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने जपली पाहिजे. डोळ्यातील प्रेम आणि हृदयातील वात्सल्य कधीही कमी होऊ देऊ नका.

अनिल बागणे म्हणाले, शरद इन्स्टिट्युट म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, तर उद्योग, कौशल्य आणि संस्कारांचे मंदिर आहे. विद्यार्थ्यांना समाजातील संघर्षांना सामोरे जाण्याची ताकद देणारा ‘शरद पॅटर्न’ घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविद्यालयातील प्रत्येक घटकाचा आर्थिक, सामाजिक, बौद्धिक व तांत्रिक स्तर उंचावण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. शेवटच्या विद्यार्थ्याच्या हाताला रोजगार मिळेपर्यंत आमचे प्रयत्न सुरूच राहतील. शरदने गुणवत्तेचे सर्व मापदंड पूर्ण केलेले असून भविष्यात समाज निर्व्यसनी व संस्कारीत रहावा यासाठी कार्यरत राहील.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. ताशिलदार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी उत्कृष्ट विद्यार्थी श्रध्दा सुतार तर उत्कृष्ट वस्तीगृह विद्यार्थी पार्थ पारिख , विद्यार्थीनी प्राची पाटील यांचा सन्मान करण्यात आला. 

दरम्यान दोन दिवसांमध्ये पारंपरिकदिन, रेकॉर्ड व पेपर फिशपॉन्ड, फॅशनशो, रांगोळी, मेहंदी, पाककला, सॅलेड डेकोरेशन यासह क्रिकेट, हॉलीबॉल, कब्बडी, खो-खो, अथलेटीक्स, बुध्दीबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबलटेनिस विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. 

प्राचार्य बी.एस. ताशिलदार, उपप्राचार्य प्रा. पी.एस. चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. दिपाली पाटील, प्रा. अंकिता धड्डे, एलआर श्रध्दा सुतार, जीएस धर्मराज उपाध्ये यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व डीन, विभागप्रमुख, क्रिडा विभागाचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुजा जुगळे व प्रा. धनश्री लोहार यांनी केले. आभार श्रध्दा सुतार यांनी मानले.