तुम्ही शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार? श्वेता महालेंनी पुन्हा संजय गायकवाडांना डिवचलं; बुलढाण्यातील महायुतीचा वाद कायम

तुम्ही शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार? श्वेता महालेंनी पुन्हा संजय गायकवाडांना डिवचलं; बुलढाण्यातील महायुतीचा वाद कायम

मुंबई (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील दोन आमदारांमध्ये चांगलाच संघर्ष पाहायला मिळतोय. अशातच हा संघर्ष अजूनही थांबताना दिसत नाहीये. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच भाजप आमदार श्वेता महाले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना डिवचलं आहे.

 ‘आम्ही पक्ष वाढवण्याचं काम करतोय,’ असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना श्वेता महाले यांनी खऱ्या शिवसैनिकांना सोडून केवळ आपली पत्नी आणि दोन्ही मुलांना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जात आहे, असा आरोप केला. ‘तुम्ही शिवसेना पक्ष वाढवत आहात की स्वतःचा परिवार वाढवत आहात?’ असा सवाल करत आमदार श्वेता महाले यांनी पुन्हा एकदा संजय गायकवाड यांना डिवचलं आहे.

 आता यावर आमदार संजय गायकवाड काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे बुलढाण्यातील महायुतीतील हा संघर्ष तूर्तास तरी थांबताना दिसत नाहीये. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर श्वेता महाले यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला.

 वीजपुरवठा खंडित करण्यामागे आमदार संजय गायकवाड यांचा हात असल्याचा संशयही त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केला. ‘हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा,’ असं म्हणत त्यांनी आमदार गायकवाड यांना थेट ओपन चॅलेंज दिलं. दरम्यान, आमदार श्वेता महाले यांनी दिलेल्या या आव्हानाला संजय गायकवाड यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राजकारणातला बाप कोण आहे, हे योग्य वेळी दाखवून देऊ,’ असं म्हणत त्यांनी प्रतिहल्ला केला.

 यावेळी संजय गायकवाड म्हणाले की, श्वेता महाले या महिला आमदार आहेत. माझी बहीण आहेत, ताई आहेत. त्यांनी मला समोर येऊन बोलायला सांगितलं. पण बँकेच्या निवडणुकीत आम्ही सोबत होतो. एका ताटात आम्ही एका चमच्याने जेवण केलं आहे. त्यामुळे समोर येण्याचा काही प्रश्नच नाही. वाढदिवसाला स्पर्धा करणं हा काही विषय नव्हता. त्यांनी बुलढाण्यामध्ये भाजप वाढवावी आणि आम्ही चिखलीमध्ये शिवसेना वाढवू. मग कशाला विरोध करता, असा सवालही संजय गायकवाड यांनी केला.

 तसंच, ‘फक्त इकडची भाजपा काँग्रेसच्या दावणीला बांधली जाणार नाही, याची काळजी घ्या,’ असा सल्लाही आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना दिला आहे. त्यामुळे श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यातील हा राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता असून, आता या आरोप-प्रत्यारोपांना पुढे काय वळण मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.