राजकारण हा अभिजीत दिपकेचा प्रांत नाही, त्याला जाणीवपूर्वक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न: संजय शिरसाट
मुंबई: नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी'च्या माध्यमातून आंदोलन करून चर्चेत आलेला तरुण अभिजीत दिपके याच्याविषयी राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीतच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकारण हा अभिजीत किंवा त्याच्या कुटुंबाचा भाग नसून, काही लोक त्याला जाणीवपूर्वक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

संजय शिरसाट यांनी घेतली दिपकेच्या कुटुंबाची भेट
मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दिपकेच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीमागील कारण स्पष्ट करताना शिरसाट म्हणाले, "मी अभिजीतला लहानपणापासून ओळखतो. माझा मुलगा त्याच्या बहिणीकडून राखी बांधून घेतो. दिपके कुटुंबीय माझे जवळचे नातेवाईक आणि माझ्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे त्यांची आत्मीयतेने विचारपूस करणे माझे कर्तव्य होते."
आंदोलनादरम्यान भेट न देण्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की, जर आंदोलनाच्या काळात भेट दिली असती, तर त्यावर चुकीच्या चर्चा आणि उलटसुलट बातम्या पसरल्या असत्या. म्हणूनच आंदोलन संपल्यानंतर आपण त्याच्या घरी भेट दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"राजकारण हा अभिजीतचा विषय नाही"
अभिजीत दिपकेने माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांची भेट घेतल्यानंतर, त्याला विरोधकांकडून खासदारकीची ऑफर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, अभिजीतने केवळ भावनिक होऊन ते आंदोलन केले होते. परंतु, राजकारण हा त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या जिव्हाळ्याचा विषय अजिबात नाही. अभिजीतने चांगली नोकरी करावी आणि आपल्या संसारात सुखात राहावे, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा आहे. राजकारणात यायचे की नाही, हा सर्वस्वी त्याचा वैयक्तिक निर्णय असेल.
विरोधकांवर गंभीर आरोप
अभिजीतची इच्छा नसतानाही काही लोक त्याला बळबजोरीने राजकारणात ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शिरसाट यांनी केला. अभिजीतच्या खांद्यावरून काही राजकीय मंडळी स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. तसेच, अभिजीतने दिल्लीत आंदोलन केले म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटले जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही शिरसाट यांनी शेवटी नमूद केले.




