बीडमध्ये मित्राचा खून; रेल्वे अपघाताचा बनाव कुत्र्यांनी हाणून पाडला
बीड (प्रतिनिधी) : बीडच्या परळी परिसरात पैशांच्या किरकोळ वादातून दारूच्या नशेत 36 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह लेंडेवाडी परिसरातील रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोकाट कुत्र्यांनी मृतदेह बाजूला ओढल्यामुळे हा डाव फसला आणि खुनाचा संपूर्ण थरार समोर आला.

सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत प्रकरणाचा छडा लावून ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या मयताच्या दोन मित्रांना अटक केली आहे. अबजल उर्फ तौहिद खान कैराती खान असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तौहिद आणि दोन्ही आरोपी हे एकमेकांचे जिवलग मित्र असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सदरील आरोपीने या घटनेबाबतची माहिती दिल्याचे समजत आहे.
31 मे रोजी मयतासह तिघे ऋषिकेशच्या कारमधून परळी तालुक्यातील वरवटी शिवारात गेले होते. तेथे त्यांनी दुपारी दारूचे सेवन केले. त्यानंतर रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास पुन्हा एकदा पार्टी केली. या पार्टीदरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीवरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद चिघळत गेल्यानंतर ऋषिकेश आणि गौरव यांनी बाजूला पडलेला मोठा दगड उचलून तौहिदच्या डोक्यात मारला. तौहिद बेशुद्ध पडल्यावरही नशेत असलेल्या आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घाबरलेले आरोपी मध्यरात्री सुमारे 1.30 वाजेपर्यंत मृतदेहाजवळच थांबले होते. त्यानंतर त्यांनी तौहिदचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि लेंडेवाडी शिवारातील रेल्वे पटरीवर नेऊन ठेवला. तौहिदने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा भास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह ओढत रेल्वे रुळांबाहेर आणल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
1 जून रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच परळी शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित म्हणून ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांना ताब्यात घेतले.




