पुढील २४ तास धोक्याचे! हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट; महाराष्ट्राला मुसळधार पाऊस झोडपणार

पुढील २४ तास धोक्याचे! हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट; महाराष्ट्राला मुसळधार पाऊस झोडपणार

महाराष्ट्र : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत असून मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. पूर्व विदर्भातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे आणि त्याचा प्रभाव कायम असल्याने पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे असणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चोवीस तास पावसाची हीच भीषण परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

प्रमुख घडामोडी हवामान अंदाज:

·         घाटमाथ्याला रेड अलर्ट: हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा भागासाठी हवामान विभातर्फे 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे, तर पुणे शहरासाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. रविवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

·         दरडी कोसळण्याचा धोका: घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घाट परिसरात जाताना विशेष दक्षता घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

·         धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी शाळांना सुट्टी: धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भाग जलमय झाले आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

·         धरणांमधून पाण्याचा विसर्ग: सततच्या पावसामुळे शिरपूर तालुक्यातील अनेर धरणातून ,९२१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच अक्कलपाडा धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी-नाल्यांजवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.